लोकसभेत घटना दुरुस्ती नामंजूर

५४ मतांमुळे नारीवंदनला नकार

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्वकांक्षी १३१ वी दुरुस्ती नारीवंदन विधेयककेंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक, आणि सीमांकन विधेयक, लोकसभेत सादर केली होती. या घटनादुरुस्तीला ५४ मते कमी पडल्यामुळे एतिहासिक नारीवंदन विधेयक फेटाळले गेले. त्यामुळे पुढील दोन्ही विधेयक सरकारने मांडली नाहीत.

हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं मंजूर करण्यासाठी लोकसभेतील उपस्थित सदस्यांच्या दोन तृतियांश मते आवश्यक असतात. लोकसभेत या घटनादुरुस्ती  विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आलं. घटनादुरुस्तीच्या बाजूनं पहिल्या फेरीत एकूण ५२८ खासदारांनी मतदानं केलं. घटना दुरुस्तासाठी दोन तृतीयांश म्हणजे ३५२ मते आवश्यक होती पण सरकारच्या या विधेयकाच्या बाजूने २९८ मतदान झालं, तर घटनादुरुस्ती विधेयकाच्या विरोधात २३० मतं नोंदवली गेली आहेत. आता राज्यसभेत उद्या मतदान होणार आहे.

२०२९ च्या निवडणुकीत लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांमध्ये वाढ करुन राज्यातील लोकसभेच्या जागा ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ३५ जागा मिळून ८५० जागा करण्याचा प्रस्ताव विधेयकात होता. सरकारचा महिला आरक्षणातील दुरुस्ती  विधेयकासोबत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मांडलं होतं. विरोधी पक्षांकडून नेमका याच मुद्याला आक्षेप होता.

अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटलं की 2023 मध्ये विरोधी पक्ष महिलांना आरक्षण देण्याचा शब्द दिलं होतं आता द्यायचा विषय आलेला असताना मागं हटत आहेत. महिला आरक्षण लटकवत  आहात, तुम्ही निवडणुकीत जिथं जिथं जात असाल तिथं तुम्हाला या देशातील महिलांचा आक्रोश सहन करावा लागेल, असं  अमित शाह म्हणाले.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सरकारनं आणलेल्या विधेयकावर बोलताना केंद्र सरकारला महिला आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत लागू करायचं असेल तर ५४३ जागांमध्येच अंमलबजावणी करावी, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी मांडली.  केंद्र सरकारचा लोकसभेची सदस्यसंख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न वरवर पाहता यात आपत्ती वाटत नाही मात्र सखोलपणे विचार केल्यास यातील राजकीय हेतू लक्षात येतो, असं प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या.

“मोदी जादूगार” – राहुल गांधी

राहुल गांधींनी महिला विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महिला विधेयकाला लक्ष्य करण्यासाठी लहानपणी घडलेली जादूगाराची एक गोष्ट सांगितली. “मी आणि माझी बहीण लहानपणी एका जादूगाराचा खेळ बघायला गेलो होतो. त्यानं सुरुवातीला काही खेळ दाखवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग त्यानं स्वत:ला साखळ्यांनी बांधलं आणि कुलूप लावलं. वरून काळा कपडा टाकून घेतला. नंतर आत बरीच हालचाल झाली. पण जादूगाराला बाहेर येता आलं नाही. त्याच्या सहाय्यकांना नंतर त्यानं बोलावून काळा कपडा काढायला लावला. कुलूप उघडण्यात त्याला अपयश आलं. त्यानं जादू करण्यात एक चूक केली आणि त्याची जादू फसली”, असा किस्सा राहुल गांधींनी सांगितला.

“त्यानंतर जादूगारानं इतरही खेळ करून दाखवायचा प्रयत्न केला. पण यावेळी त्यावर टाळ्या न पडता उपस्थित सगळे हसू लागले. त्याच्या जादूचा प्रभाव संपला होता”, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कथेतील जादूगाराची उपमा देताच सत्ताधारी बाकांवरून गदारोळ झाला. “सत्य हे आहे की जादूगार पकडला गेला आहे. बालाकोट, नोटबंदी, ऑपरेशन सिंदूर या जादू फसल्या. जादूगार पकडला गेला”, असं राहुल गांधी म्हणाले. त्यावर किरण रिजिजू यांनी तीव्र नाराजी नोंदवली. इतरही सत्ताधारी खासदारांनी गदारोळ केला.

यावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. खुद्द अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील राहुल गांधींनी अशा शब्दांचा वापर न करण्याबाबत निर्देश दिले. सत्ताधारी बाकांवरून किरेण रिजिजू, राजनाथ सिंह या मंत्र्यांनीदेखील राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *