ईडी चौकशीच्या तिसऱ्यादिवशी
भोंदुबाबा खरातचा निकटवर्तीय
जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू
हरिभाऊ लाखे
नाशिक : नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे (Ashok kharat) निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांची तीन दिवसापुर्वीच ईडीकडून चौकशी करण्यात आली होती आणि आज त्यांचे अपघाती मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा घात होता की अपघात असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला.
शेळकेंच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकीकडे अशोक खरात प्रकरणावरुन एसआयटीकडून सखोल तपास केला जात असून दुसरीकडे ईडीनेही खरातच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्यातच, खरातच्या शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संशय निर्माण होत आहे.
चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे असा सवाल राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
जितेंद्र शेळके यांची दोन दिवसापूर्वी चौकशी होते, आज चौकशीच्या भोवऱ्यात असलेल्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू दाखवल्या गेलं? याचं खरं सत्य कधी समोर येणार, याबाबत आता मनात मोठी शंका असल्यासं मिटकरी यांनी म्हटलं. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी देखील हेच प्रश्न उपस्थित केले आहेत.
