ही तर भाजपची राक्षसी

महत्त्वाकांक्षा– राज ठाकरे

मुंबई : भारतीय जनता पक्ष हा गेली १० वर्षे पक्ष फोडत होता, आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता, पण आता यांची मजल देशात दोन गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जो प्रयत्न करत आहे, त्यांनी हा देश कायमचा दुभंगेल आणि राज्याराज्यांत स्वायत्ततेची मागणी सुरु होईल. एव्हढच नव्हे तर याचे परिणाम आपल्या संरक्षण आणि गृह विभागात देखील दिसून येतील ही तर भाजपाची राक्षसी महत्वकांक्षा आहे अशी टिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली.

मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना भेटण्यासाठी राज ठाकरे पालिका मुख्यालयात आले होते तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

अवघ्या काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीने काय रक्तरंजित संघर्ष उभा केला होता हे विसरू नका… जो असंतोष पंजाबमध्ये निर्माण झाला होता तसा असंतोष उद्या ईशान्य भारतातील राज्यांपासून ते दक्षिणेतील राज्यांमध्ये निर्माण झाला तर? आणि अशी परिस्थिती  उद्भवली तर त्याला भारतीय जनता पक्षाची सत्तेची राक्षसी महत्वाकांक्षा जबाबदार असेल हे नक्की, अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर थेट प्रहार केलाय.

ज्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाने राजकारण करता आणि मतं मागता, त्या वल्लभभाईंना हा देश एकत्र आणताना काय संघर्ष करावा लागला होता हा इतिहास भाजपच्या लक्षात असेल असं मी गृहीत धरतो. त्या संघर्षाला तुमच्या स्वार्थासाठी मातीमोल करू नका. लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या वाढवा जरूर पण सध्याचा राज्यांचा जो कोटा आहे त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे. गुजरात , पश्चिम बंगाल, पंजाब ,महाराष्ट्र, गोवा , आंध्रप्रदेश , तेलंगणा , तामिळनाडू , कर्नाटक , केरळा , आसाम तसेच पूर्वेकडील राज्यांच्यासाठी किमान हमी जागा द्या आणि उरलेल्या लोकसंख्येनुसार जागांचे वाटप करा. सध्या केंद्र सरकार जे करत आहे तो एक प्रकारे आगीशी खेळ खेळत आहेत. लोकसभा हा आकड्यांचा आखाडा बनवून त्यांना सत्तेत रहायचं आहे पण त्यांना हे समजत नाहीये की आज ना उद्या याने भारताच्या संघरचनेच्या पायालाच धक्का लागेल आणि त्यातून या देशात अराजकता माजायला वेळ सुद्धा लागणार नाही. असेही ते म्हणाले.

मुंबई महानगर पालिकेच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना भेटायला मनसे प्रमुख राज ठाकरे आज पालिका मुख्यालयात आले होते. ( छाया – पी. सुशील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *