मुंबई: महापौर आणि उपमहापौर आयुक्तांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई  विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती  स्थानिक नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी दिली आहे.
एरवी उड्डाणपुला खालील जागावर अतिक्रमण होत असते किंवा जुन्या गाड्यांचे डम्पिंग होत असते.   त्यामुळे विलेपार्ले पूर्व येथील विमानतळाच्या बाहेरील पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुला खालील जागेचा सदुपयोग व्हावा या हेतूने “विलेपार्ले कल्चरल सेंटर” तर्फे शहरी शेती प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव “के-दक्षिण विभागा”कडून मान्य करवून घेतला  अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली. संबंधित प्रकल्पात प्रत्यक्ष शास्त्रीय पद्धतीने वाफे तयार करण्यात आले असून त्यावर विविध फळ भाज्या लावण्यात येणार आहेत. तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या प्रेरणेने शहरी शेती अभ्यास वर्ग चालवण्यात येणार असून या मध्ये अनुभवी व प्रशिक्षित मान्यवर प्रत्यक्ष शेतकामा विषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच सोबत, वनस्पती वैविध्य दालन (plant diversity gallery) आणि वनस्पती सांभाळ केंद्र (plant care center) सुद्धा चालवण्यात येणार आहेत.
तर फुलपाखरू उद्यान,पक्षांना आकर्षित कसे करावे, माळी  काम कसे करावे इत्यादी विषयात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. सादर केलेल्या बाबत अधिक माहिती करून घ्यायची असल्यास, मुंबई विमानतळ T१ मेट्रो स्थानका समोरील या प्रकल्पास रविवारी, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.30 वाजता जरूर यावे, असे आवाहन आमदार पराग अळवणी व नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *