शहापूरच्या गरीब आदिवासींना मिळतेय रोजी रोटी
अविनाश उबाळे
ठाणे : जंगलात रानावनात डोंगर कपारीत राहणार्या आदिवासी समाजाने आपल्या दोन वेळच्या घासासाठी जंगलात भटकंती करताना रोजगाराच्या वाटा या स्वतः शोधल्या आहेत.कशासाठी तर वितभर पोटासाठी सरकारी मदतीची वाट न पाहता जगण्यासाठीचा हा संघर्ष आदिवासींचा कायम दिसतो आहे. कशासाठी तर वितभर पोटासाठी प्रत्येक मोसमात त्याने वेगवेगळे व्यवसाय करून काबाडकष्ट करून दोन पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहेत.शहापूर तालुक्यातील वाशिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा ,तानशेत, उंबरमाळी, आघई ,तानसा, दहागाव पिवळी, माहुली, या ग्रामीण भागातील आदिवासी बहुल वस्त्यावरील आदिवासी हे दरवर्षी पळसाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात.जवळपास या व्यवसायातून आदिवासी समाजाची बहुतांश कुटुंब आपली रोजीरोटी चालवितात. दाट जंगलात, डोंगर कपारीत भटकंती करून आदिवासी पुरुष,महिला ही पळसाची पाने मोठ्या मेहनतीने खुडून आणतात.नंतर या पानांचे गठ्ठे बांधून ते जंगलातून पायपीट करत डोक्यावर वाहून मध्य रेल्वेच्या कसारा खर्डी, आटगाव, आसनगाव, वासिंद,या रेल्वे स्थानकात आणून रेल्वेने पुढे मुंबई, दादर, ठाणे, डोंबिवली,कल्याण या शहरातील फुलमंडईत विक्रीसाठी नेतात. फुले बांधण्यासाठी पळसाच्या पानांना फुल मंडईत मोठी मागणी असते.पळसाच्या पानाच्या विक्रीतून त्यांना रोज ४०० ते ५०० रुपयांची कमाई होते.असे या व्यवसायातील सुकरी निरगुुडा या आदिवासी महिलेने माहिती देताना सांगितले.काही आदिवासी हे पळसाची पानं ही उत्तर भारतीय लोकांना रेल्वे स्थानकातच अगदी अल्प दरात विक्री करतात.यातून स्थानिक आदिवासींना दोन पैसे मिळतात.पळसाच्या पानांच्या विक्रीचा हा शहापूरातील आदिवासींचा पिढीजात व्यवसाय आहे.या व्यवस्यातून आदिवासी कुटुंबे आपली रोजीरोटी भागवतात पळसाच्या पानांच्या व्यवसायासोबत आदिवासी मोठ्या कौशल्याने
बांबूपासून टोपल्या,सूप, इरणा,चाप,कनगा आदी वस्तू बनवितात.या सर्व वस्तू साधारण पावसाळा मोसमाच्या नंतर हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या मोसमात शहरांतील आठवडी बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.यातून त्यांना दररोज ३००ते ४०० रुपयांची कमाई होते. त्यांच्या बांबू हस्तकलेच्या व्यवसायाने देखील देखील आदिवासींना रोजगार प्राप्त करून दिला आहे.
