अपना बाजारच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त
मुंबई: अपना बाजारचा ७८ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पर्यटन तसेच मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपना बाजार को-ऑप. सोसायटीच्या विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून तब्बल २८७ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. दादर (पूर्व) येथील अपना बाजारच्या मुख्य कार्यालयात नुकत्याच आयोजित केलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली. यावर्षी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये रक्तसाठा चिंताजनक पातळीवर असताना, या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या शिबिरासाठी तरुण मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात नागरिकांनी उत्साहाने रक्तदान करत ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आणला. अपना बाजार चे अध्यक्ष अनिल गंगर यांनी सांगितले की, “मुंबईत रक्ताचा तुटवडा असताना समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला. एका रक्तदानातून तीन दिवस जीव वाचू शकतात, ही जाणीव समाजात अधिक दृढ व्हावी हा यामागील उद्देश आहे.” वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन दळवी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. आमदार कालिदास कोळंबकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, स्वीकृत नगरसेविका माधुरी मांजरेकर आदी मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व रक्तदाते, कर्मचारी, स्वयंसेवक आणि आयोजन समितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समाजहितासाठी यापुढेही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक जगदीश नलावडे यांनी सांगितले.
