रमेश औताडे
मुंबई : विविध समाजघटकांना जातीय अन्यायाचे चटके सहन करावे लागले होते. त्या सर्व पीडित समाजघटकांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विचारमाळेत गुंफून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मात्र आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली हे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, त्याला वेळीच लगाम घालण्यासाठी राज्यभरात “अनुसूचित जाती समन्वय अभियान” राबविण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आली आहे.
२५ मे रोजी नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त “अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस” साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजघटकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडू शकते, हा धोका विविध घटकांना समजावून सांगण्यावर या अभियानाचा भर असणार आहे.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, जिल्हा सांगली येथे कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे अभियान राबविण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात पोचिराम कांबळे यांच्या जन्मगाव तैरभुनी, जिल्हा नांदेड येथे कार्यक्रम होणार असून, चौथ्या टप्प्यात प्रथम अस्पृश्य परिषदेमुळे ऐतिहासिक ठरलेल्या सुकळी मानगाव, जिल्हा कोल्हापूर येथे अभियानाचा समारोप होणार आहे. या अभियानाद्वारे अनुसूचित जातींमध्ये सामाजिक ऐक्य, समन्वय आणि संविधानिक हक्कांविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रदेश जनसंपर्क प्रमुख डॉ. श्रीकृष्ण बेडसे यांनी माध्यमांना सांगितले.
00000000000
