भारताच्या ‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक आधारावर चार टक्क्यांनी वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च 23 हजार 21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्राने एकूण विक्रीत 15.31 टक्के वाट्यासह अव्वल स्थान मिळवले आहे. ‘इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन’ (आयडीएसए) च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
‘डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री 2025 आउटलुक’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात या उद्योगाचा व्यवसाय 22 हजार 142 कोटी रुपये होता. बाजार संशोधन कंपनी ‘आयपॉस’ने हा अभ्यास केला आहे. हा अहवाल खासदार आणि ‘कॅट’चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या हस्ते एका कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आला. खंडेलवाल यांनी सांगितले, की देश ‘विकसित भारता’ च्या दिशेने वाटचाल करत असून उद्योजकता, स्वयंरोजगार आणि सर्वसमावेशक आर्थिक सहभाग वाढवणाऱ्या क्षेत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी ‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाला सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम असे संबोधले. अहवालानुसार, मागील सहा वर्षांत या उद्योगाने 6.5 टक्के संयोजित वार्षिक वाढ दर म्हणजेच ‘सीएजीआर’ नोंदवला आहे. 2019-20 मध्ये सुमारे 16 हजार आठशे कोटी रुपयांचा असलेला उद्योग 2024-25 मध्ये वाढून 23 हजार 21 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
प्रदेशानुसार पाहिले असता, उत्तर भारताचा एकूण विक्रीत सर्वाधिक 27.58 टक्के वाटा राहिला. त्यानंतर पश्चिम विभागाचा 25.47 टक्के, पूर्व विभागाचा 22.47 टक्के, दक्षिण विभागाचा 17.81 टक्के आणि ईशान्य विभागाचा 6.67 टक्के वाटा राहिला. राज्यांमध्ये महाराष्ट्र 15.31 टक्के वाट्यासह पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर पश्चिम बंगालचा 10.88 टक्के, उत्तर प्रदेशचा 8.82 टक्के, कर्नाटकचा 6.37 टक्के आणि बिहारचा 5.61 टक्के वाटा राहिला. उद्योगातील उत्पादनांच्या प्रकारांमध्ये आरोग्य आणि पोषणाशी संबंधित उत्पादनांचा सर्वाधिक म्हणजे जवळपास 60 टक्के हिस्सा राहिला. सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक देखभाल उत्पादनांचा हिस्सा 26 टक्के, तर घरगुती वापराच्या उत्पादनांचा हिस्सा पाच टक्के राहिला. या तीन प्रकारच्या उत्पादनांचा मिळून उद्योगाच्या एकूण विक्रीत 91 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
अहवालानुसार, ‘डायरेक्ट सेलिंग’शी संबंधित सक्रिय विक्रेत्यांची संख्या वाढून 93.2 लाखांवर पोहोचली आहे. मागील वर्षी ही संख्या 88 लाख होती. विशेष म्हणजे, एकूण विक्रेत्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढून 48 टक्के झाला आहे, जो मागील वर्षी 44 टक्के होता. ‘आयडीएसए’चे अध्यक्ष रत्नेश लाल यांनी सांगितले, की या अहवालातील निष्कर्ष भारतातील ‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाची वाढती ताकद दर्शवतात. सातत्याने होत असलेली वाढ, महिलांचा वाढता सहभाग, नवउद्योजकांची वाढती रुची आणि किरकोळ उद्योजकतेच्या वाढत्या संधी या क्षेत्रात सर्वसमावेशक आर्थिक विकासाला गती देण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच मागील सहा वर्षांतील 6.5 टक्क्यांच्या सातत्यपूर्ण ‘सीएजीआर’मुळे अनुकूल धोरणात्मक वातावरण आणि ग्राहकांचा वाढता विश्वासही स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
