५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल
कल्याण : टिटवाळा स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन याविरोधात स्वतंत्र वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तब्बल ४० दुचाक्यांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकावर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या चार जणांवर तसेच विनायूनीफॉर्म वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेकडून टिटवाळा स्टेशन परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. बी. घोरपडे, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी ही कारवाई केली. स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, टिटवाळ्यासह ठाणे ग्रामीण परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी सातत्याने लावून धरली होती. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारा शहर विस्तार, स्टेशन परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
००००००००
