सिद्धेश शिगवण
ठाणे : ठाणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागण्याची शक्यता असून, रिक्षा आणि टॅक्सी प्रवास लवकरच महाग होण्याची चिन्हे आहेत.सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, वाढती महागाई आणि वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च यामुळे ठाण्यात रिक्षा आणि टॅक्सी प्रवास लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) भाडेवाढीची मागणी केली आहे.
समितीने आरटीओला दिलेल्या पत्रानुसार, रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रति किलोमीटर ४ रुपयांची वाढ तसेच पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २ रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएनजीचे दर ८४ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने चालकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा दावा रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केला आहे.
ठाणे शहरात सुमारे ८ लाख वाहने सीएनजीवर धावत असून, त्यामध्ये जवळपास २ लाख रिक्षा, १ लाखांहून अधिक टॅक्सी आणि ५ लाखांपेक्षा जास्त खासगी वाहनांचा समावेश आहे. वाढती महागाई, वाहनांच्या किंमती, दुरुस्ती व देखभाल खर्च तसेच बँक कर्जाचा वाढलेला बोजा यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरातील रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या सूत्रानुसार तातडीने भाडेवाढ लागू करण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केली आहे.
