प्लास्टिक मुक्तीसाठी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा पुढाकार
सिद्धेश शिगवण
ठाणे :जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने “आशाये” हा पर्यावरणपूरक आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि शाश्वत पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या उपक्रमाची संकल्पना व रचना VesacIndia चे संस्थापक विजयकुमार कट्टी यांनी केली असून, त्याचे समन्वयन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रारंभी हा उपक्रम पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार असून, भविष्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी १० पुनर्वापरयोग्य नॉन-वुव्हन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांचे योगदान देणे अपेक्षित आहे. या पिशव्या घर, सोसायटी आणि परिसरातून संकलित करून ३ जून २०२६ पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकलनासाठी विजयकुमार कट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.या सामूहिक सहभागातून सुमारे २ लाख ५० हजार पुनर्वापरयोग्य पिशव्या संकलित होण्याचा अंदाज असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत होणार आहे. उपक्रमामुळे ५६ हजार किलोहून अधिक प्लास्टिक कचरा टळणार असून, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात लक्षणीय घट होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी शासकीय कार्यालयांतून राबविण्यात येणारा हा देशातील पहिला उपक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या माध्यमातून पुनर्वापर संस्कृतीला प्रोत्साहन मिळून पर्यावरण संरक्षणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांना बळकटी मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी कर्मचारी संख्या, कार्यालयांचे पत्ते आणि नोडल अधिकाऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *