शतक महोत्सव चार दिवसांवर असतानाच काळाचा घाला; गावावर शोककळा
नारायणगाव : आपल्या अंगभूत कौशल्याने अनेकांच्या डोळ्यात गेलेला कचरा कापसाच्या बोळ्याने सहजतेने व विनामोबदला काढून देणाऱ्या आणि त्यामुळे पंचक्रोशीत ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील समाजसेविका, आदर्श माता, समाजभूषण व दानशूर व्यक्तिमत्व अनुसयाबाई सावळेराम डबडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनुसयाबाई डबडे यांनी नुकतेच वयाचे शतक पूर्ण केले होते. त्यांच्या शतकपूर्ती निमित्त येत्या रविवारी शिरोली बुद्रुक येथे भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथतुला, आजींवरील गौरवग्रंथाचे प्रकाशन, संपूर्ण गावासाठी स्नेहभोजन तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ होणार होता. कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारणीसह सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, आनंदाच्या या वातावरणावर त्यांच्या निधनाने दुःखाची छाया पसरली. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी शिरोली बुद्रुक येथील कुकडी नदीच्या तीरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात मुलगा अनिल तसेच ताईबाई, मीराबाई आणि ताराबाई या मुली असा परिवार आहे. अनुसयाबाईंनी गावातील न्यू इंग्लिश स्कूलसाठी तब्बल पाच एकर जमीन दान दिली होती. याशिवाय त्यांनी अनेक कौटुंबिक वाद मिटवून असंख्य कुटुंबांचे संसार सुखी करण्याचे कार्य केले होते.
पूर्वी गावात किंवा परिसरात दवाखान्यांची सुविधा नसताना शेतात काम करताना किंवा इतर कारणांनी डोळ्यात कचरा गेलेल्या लोकांना त्या कापसाच्या बोळ्याने अत्यंत कौशल्याने आराम देत असत. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’ ही ओळख मिळाली होती. त्यांनी कोणताही मोबदला न घेता आयुष्यभर लोकसेवा केली. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शतक महोत्सव न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणार होता. या कार्यक्रमास विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते. त्यांच्या भाषणातून आजींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव होणार होता. मात्र, तत्पूर्वीच आजींनी जगाचा निरोप घेतल्याने गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त होत आहे.
