प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा!
मिरा -भाईंदर :मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी माणसाचा सन्मान राखावाच लागेल हाच बाणा पुन्हा एकदा दाखवून देत मिरा -भाईंदरमध्ये घडलेल्या एका संतापजनक घटनेविरोधात मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्र घेतला. स्वतःच्या कष्टाने आणि स्वाभिमानाने ‘शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर’ चालवून कुटुंबाचा आधार बनलेल्या मराठी भगिनी सौ. रविना शिंदे यांना ‘तू मराठी आहेस’ म्हणून घर नाकारण्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी या नात्याने मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविना यांच्या स्टाॅलला भेट देऊन तिच्या हातचा चहा पिला आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि शिंदे कुटुंबाला धीर दिला. एवढेच नव्हे तर मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या त्या संबंधित घरमालकाला तत्काळ घटनास्थळी बोलावून घेत मंत्री सरनाईक यांनी अत्यंत कठोर शब्दात त्यांची कानउघडणी केली आणि त्याला कायदेशीर परिणामांची जाणीव करून दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश; कायदेशीर कारवाईचा बडगा
या संतापजनक प्रकाराची केवळ दखल न घेता, मंत्री सरनाईक यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. संबंधित घरमालकाविरोधात पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तातडीने पत्र देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी आणि हक्काशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
ते पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दांत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठी माणसाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जर कोणी चुकीच्या पद्धतीने दादागिरी, दंडुकेशाही किंवा गुंडगिरी करत असेल, तर त्याला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल. यापुढे कोणत्याही मराठी माणसाला घर नाकारले गेल्याचे समोर आले, तर तिथे जाऊन थेट जाब विचारा, अशा कडक सूचना मी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
