घराची तोडफोड, जीवघेणा हल्ला
दोन आरोपी अटकेत
कल्याण : म्हारळ गावातील एका कुटुंबाच्या घरात घुसून तोडफोड, महिलेशी गैरवर्तन आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात आरोपी अद्याप फरार आहेत.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेचा राग आरोपींनी मनात धरला होता. याच जुन्या वादातून २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.२५ वाजता आरोपी आपल्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरी पोहोचले.
आरोपींनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून लोखंडी रॉडच्या साहाय्याने घरातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी फिर्यादीच्या बहिणीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. याला विरोध केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर हल्ला चढविला.
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व चाकूच्या सहाय्याने आशिष खांडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. फिर्यादीने बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि करण अमर राजपूत यांना अटक केली. दोन्ही आरोपींना ३० मे रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासात मुख्य आरोपी हरेश प्रधान याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सध्या फरार असलेल्या सात आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे म्हारळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
