नवी मुंबई : जनगणना २०२७ बाबतच्या कामकाजास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात १५ मे पर्यंत स्वयंगणना केल्यानंतर आता जनगणना विषयक माहिती गोळा करण्याचे काम प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सुरू झाले आहे. त्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ३५०० प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रगणकांमार्फत घरोघरी भेटी देऊन माहिती संकलनाचे काम सुरू आहे.
या अनुषंगाने जनगणना कार्य निर्देशालय यांच्या कार्यालयामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जनगणनाविषयक कामकाजाची माहिती घेण्यासाठी डेप्युटी रजिस्टर जनरल  वाय एस पाटील आणि जॉईंट डायरेक्टर  वीरेंद्र दीक्षित यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे भेट दिली.
याप्रसंगी महानगरपालिकेचे प्रधान जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व चार्ज जनगणना अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांना जनगणनेबाबतच्या कामात अधिक गतीमानता आणून १४ जून पर्यंत हे काम संपविणेबाबत निर्देश दिले. तसेच संकलित करण्यात आलेल्या माहितीची चार्ज अधिकारी स्तरावर वेळोवेळी तपासणी करून घेण्याबाबत सूचित केले. यावेळी शहर जनगणना अधिकारी  संजय शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या जनगणना विषयक कामकाजाची व नियोजनाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *