मुकुंद रांजाणे
माथेरान : नगरपरिषदेच्या बी. जे. हॉस्पिटल आवारातील रस्ता खराब झालेला असून रस्त्यात  दगडगोटे असल्याने याठिकाणी एखाद्या रुग्णाला हातरीक्षा असो किंवा ई रिक्षातून आणताना रुग्णाचे हाल होत असतात. एखाद्या गर्भवती महिलेला या वाहनातून आणण्यासाठी तर हा रस्ता खूपच त्रासदायक बनला आहे.या छोट्याशा रस्त्यासाठी फार काही खर्च नसून जे या ठिकाणी जुने पेव्हर ब्लॉक पडून आहेत तेच या रस्त्यासाठी वापरले तरी हा रस्ता आणखीन दहा वर्षे सहज तग धरू शकेल. नुकताच या दवाखान्यात सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक किशोर मोरे हे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी हृदयविकाराचा रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. ई रिक्षाच्या साहाय्याने त्या रुग्णाला आणण्यात आले होते. परंतु दवाखान्याच्या आवारातील ओबडधोबड रस्त्यावर ई रिक्षा सुध्दा चालणे कठीण बनले होते. त्यावेळी डॉ. प्रशांत यादव,  ई-रिक्षा चालक शैलेश भोसले, आणि बी. जे. हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्या रुग्णाला व्हीलचेअर मध्ये बसवून वेळेत दाखल करून डॉ. यादव यांनी ताबडतोब प्रथमोपचार केल्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.
कोट
रुग्णालयाच्या रस्त्याबाबत यापूर्वी वारंवार प्रशासनाला कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा निष्काळजीपणामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो.हा रस्ता कोणत्याही वैयक्तिक वाहनांसाठी, घोडेवाले किंवा रिक्षावाल्यांसाठी बनवायचा नाही, तर तो केवळ नगरपालिकेच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सामान्य जनतेच्या रुग्णसेवेसाठी बनवणे गरजेचे आहे. रुग्णालयाचा रस्ता तयार करण्यासाठी कोणाच्याही नाहरकत (NOC) प्रमाणपत्राचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ही थेट जनतेच्या आरोग्याशी जोडलेली सेवा आहे. रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे.नगरपालिकेच्या संबंधित विभागाला तात्काळ आदेश देऊन हा रस्ता २४ तासांत पूर्ण करून घ्यावा.जनतेच्या जिवाचा विचार करून या गंभीर विषयावर त्वरित लक्ष द्यावे.
किशोर मोरे—नगरसेवक माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *