Unit-६
कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी व ऑक्सिजन कमी झाल्याने मासे झाले मृत
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मिलापनगर तलाव म्हणजे पूर्वीचा गणेश विसर्जन तलावात गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मरून ते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे मासे कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी खराब व ऑक्सिजन कमी झाल्याने मृत पडत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे. अजूनही या तलावात हजारोंनी अनेक जातींचे मासे आणि कासवे जिवंत असून त्यांना वाचविले गेले पाहिजे. त्यासाठी तातडीने उपाययोजना केडीएमसीच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने करणे आवश्यक आहे. या तलावातील हजारो मासे मरत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून केडीएमसी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी येऊन तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे.
५ जून पर्यावरण दिन हा सर्वत्र साजरा करतांना असे तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावातील मासे मृतावस्थेत आढळले होते. असे तलावातील मासे का मृतावस्थेत आढळत आहेत याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पण याची तपासणी करून माहिती घ्यावी.
याच मिलापनगर गणेश विसर्जन तलावात काही वर्षापूर्वी असेच मासे मेले होते. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंबिवली वेलफेअर असोसिएशन यांनी केलेल्या याचिकानुसार राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाने गेल्या दहा वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी आहे. या तलावाची नियमित साफसफाई होताना दिसत नाही. काही नागरिक यात निर्माल्य आणि कचरा टाकत असल्याने तलावातील पाणी अस्वच्छ, खराब होत असते. बऱ्याच वर्षात या तलावातील गाळ काढला गेला नाही आहे.
हा तलाव जर जिवंत ठेवायचा असेल तर येथे एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षक, साफसफाई कर्मचारी ठेवावा, सीसी कॅमेरे बसवावेत, नियमित साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर या तलावाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर काही दिवसांनी हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केडीएमसीचे कार्यतत्पर उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) रामदास कोकरे यांनी या तलावाच्या साफसफाई आणि नागरिकांच्या मागणीवर जरूर विचार करावा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी या तलावातील पाण्याचे आणि मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या अहवाल प्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.
०००००००००
