गडकरी रंगायतन येथे होणार भव्य सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे
ठाणे : पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राम मारुती रोड, ठाणे या ऐतिहासिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा तसेच इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, ठाणे (पूर्व)च्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम सोमवार, १५ जून रोजी सकाळी ९ वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे.
सन १९२६ मध्ये संस्थापक कै. वामन नारायण भोळे यांनी सुरू केलेल्या या शाळेने गेल्या शंभर वर्षांत शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जोपासत हजारो विद्यार्थी घडवले आहेत. हे विद्यार्थी आज देश-विदेशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. “Life is Work” या ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेने सातत्याने प्रगती साधली आहे.
शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २३ आंतरशालेय व संस्थेअंतर्गत स्पर्धा, भव्य रॅली, शतक महोत्सव उद्घाटन सोहळा, माहितीपट निर्मिती तसेच माजी विद्यार्थी मेळावा यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन राहणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, मनसे ठाणे-पालघर अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश जाधव, नगरसेवक सुनेश जोशी तसेच नगरसेविका मृणाल पेंडसे आणि प्रतिभा मढवी हे विशेष उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शाळेच्या “१०० वर्षांचा गौरवशाली इतिहास” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास शाळेचे माजी विद्यार्थी, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *