स्थानिकांची मागणी
मुकुंद रांजाणे
माथेरान : सत्ता स्थापन होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही सभागृहात सर्वसाधारण सभा झालेली नाही त्यामुळे जनतेच्या समस्या, विकास कामे, प्रलंबित प्रश्न, पर्यटनाच्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय याबाबत काही ठोस उपाययोजना करता आलेली नाही. आज १५ जूनला नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण सभेतील विषय जनतेला माहीत व्हावे यासाठी ही सभा थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जवळपास तीन वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासकीय राजवट असल्याने त्या कार्यकाळात जो काही अनागोंदी कारभार सुरू होता. जी कामे पूर्ण करण्यासाठी घाईघाईने प्रयत्न करण्यात आले ती कामे पूर्णपणे निकृष्ठ दर्जाची आणि शासनाच्या पैशाची एकप्रकारे उधळपट्टी झाल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत ह्या गोष्टींचा उहापोह जनतेसमोर यायला हवा. कोणती कामे कशाप्रकारे मार्गी लावली गेली आहेत. काही महत्वपूर्ण कामे पूर्ण झालेली नसताना सुध्दा संबंधित ठेकेदारांना बिले अदा करण्यात आली आहेत. यामध्ये काय गौडबंगाल आहे हे सर्व जनतेच्या निदर्शनास आले पाहिजे यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सुध्दा ही सर्वसाधारण सभा थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ कलम ८१ (२) नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सार्वजनिक असली पाहिजे,कोणत्याही नागरिकाला सभेला हजर राहण्याचा अधिकार आहे.
कोट
सभा लाईव्ह असणे पारदर्शक कारभाराचे लक्षण आहे आहे.जनतेला या गावाविषयी घेतलेल्या निर्णयांची थेट माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.आपला लोकप्रिय लोकप्रतिनीधी प्रभागातील समस्या कशा मांडुन सोडुन घेतोय हे त्या मतदाराला पाहायला भेटले तर या लोकशाहीत यापेक्षा मोठा आनंद नाही.
भास्करराव शिंदे–उद्योजक माथेरान
