कल्याण पूर्वेत मनसेच्यावतीने ५८ वृक्षांचे वृक्षारोपण
कल्याण : कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील कोणत्याही बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही असा इशारा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत गणेश टेकडी येथे ५८ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अंकुश राजपूत बोलत होते.
राज ठाकरे हे एकमेव नेते असे आहेत जे त्यांच्या वाढदिवसाला देखील कुठलीही गोष्ट कोणत्याही कार्यकर्त्यांकडून मागत नाहीत. राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिनी कार्यकर्त्यांना झाडे लावण्याचे तसेच पाणवठे तयार करण्याचे आवाहन केले होते. जंगलातील झाडे तोडल्यामुळे जंगलातील प्राणी शहरात येत असून हि झाडे तोडण्यामागे बिल्डर लॉबी असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीवर मनसेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हि टेकडी काही वर्षांपूर्वी खूप मोठी होती, मात्र आता हि टेकडी कमी झाली असून आजूबाजूच्या बिल्डरांनी पोखरून खाल्ली असल्याचा आरोप यावेळी अंकुश राजपूत यांनी केला.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गणेश टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले असून, नागरिकांनी देखील त्यांना जिथे जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करा. अनेक ठिकाणी झाडे तोडून इमारती उभ्या केल्या जात असून यामुळे प्रदूषण वाढले आहे. आजार वाढले आहेत. सत्तेत असलेले सरकार देखील झाडांची कत्तल करत असून, नाशिक मध्ये महाकुंभ मेळ्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मनसेची नाशिक मध्ये सत्ता असताना कुंभमेळा झाला होता. यावेळी एकही झाड तोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील झाडे न तोडता वृक्षारोपण करण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी केले आहे.
००००
