मुंबई महापौर करंडक स्पर्धा
मुंबई : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे १३ व १४ जून २०२६ रोजी झालेल्या मुंबई महापौर करंडक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पीटीकेएसच्या मुला-मुलींनी उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल ६८ पदके आणि ६ सांघिक करंडकांची कमाई केली. स्पर्धेत पीटीकेएसच्या खेळाडूंनी १९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि १८ कांस्य पदकांसह एकूण ६८ पदके जिंकली. तसेच एक प्रथम, चार द्वितीय आणि एक तृतीय क्रमांकाचा करंडक पटकावत संस्थेच्या यशात भर घातली.
पुरुष कलात्मक जिम्नॅस्टिक्स (MAG) गटात यश पांचाळ याने लेव्हल-७ मध्ये फ्लोअर एक्सरसाइज, पॉमेल हॉर्स, रिंग्स, पॅरलल बार्स आणि ऑल-अराउंड प्रकारात सुवर्णपदके जिंकली, तर व्हॉल्ट आणि हॉरिझॉन्टल बारमध्ये रौप्यपदके मिळवली. संघालाही प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळाले. मैराव बोहरा याने दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकून चमकदार कामगिरी केली. आर्थर मेलेक आणि नील भिडे यांनीही पदकांची कमाई करत संघाच्या विजेतेपदात मोलाचे योगदान दिले.
महिला कलात्मक जिम्नॅस्टिक्स (WAG) गटात एराह शाह हिने लेव्हल-४ मध्ये बॅलन्स बीम प्रकारात सुवर्णपदक जिंकले. लेव्हल-५ मध्ये अश्लेषा नेवरेकर हिने तीन रौप्यपदके, तर अवंतिका सिंह हिने दोन कांस्यपदके मिळवली. लेव्हल-६ मध्ये सारा पटवर्धन हिने दोन सुवर्ण, दोन कांस्य आणि ऑल-अराउंड सुवर्णपदक पटकावत विशेष लक्ष वेधून घेतले.
लेव्हल-७ मध्ये स्वाती मोहिते हिने तीन पदके जिंकत ऑल-अराउंडमध्ये रौप्यपदक मिळवले. वरिष्ठ गटात नीती दोशी हिने फ्लोअर एक्सरसाइज, बॅलन्स बीम, व्हॉल्ट आणि ऑल-अराउंड प्रकारात चार सुवर्णपदके जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. टियाना क्रास्टो हिने फ्लोअर एक्सरसाइजमध्ये रौप्यपदक पटकावले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि समर्पणामुळे पीटीकेएसने मुंबईतील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपली वेगळी छाप उमटवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *