दिव्यातील धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांचा पाठपुरावा
दिवा, दि. २१ जून (आरती परब): महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला पोलीस गृहअग्रीम कर्ज (DG Loan) प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. शासनाने सुमारे १,७६८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याने राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या सोमवारी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, DG Loan संदर्भातील समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिव्यातील धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे, पोलीस बॉईजचे प्रदीप वाघमारे तसेच राज्यभरातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सातत्याने प्रयत्न केले. विविध निवेदने, पाठपुरावा आणि संघटित प्रयत्नांमुळे हा विषय चर्चेत राहिला आणि शासनाचे लक्ष वेधण्यात यश आले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या गृहस्वप्नांशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या विषयासाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शासनाकडे हा विषय सातत्याने मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधी मंजुरीचा मार्ग मोकळा झाल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर न्याय मिळाला आहे.
या निर्णयामुळे घरकुलासाठी आर्थिक मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा झाल्याने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या कल्याणासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो एक मोठे पाऊल असल्याची भावना पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.
