मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०२५ – २६ मध्ये आयोजित २२व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ नुकताच रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या समारंभात ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल – पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील संदेश विद्यालयाने सादर केलेल्या ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या बालनाट्याने तीन पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादित केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट नेपथ्य – प्रथम क्रमांक (रु. २०,००० व प्रमाणपत्र) – निखिल बाविस्कर, मयुरेश राणे व ऋषिकेश आंद्रे ; सर्वोत्कृष्ट वेशभूषा – द्वितीय क्रमांक (रु. १२,००० व प्रमाणपत्र) – सिद्धी गोरीवले व भावना पाटील आणि अभिनय – गुणवत्ता क्रमांक (प्रमाणपत्र) – तन्मय चोरगे अशा पारितोषिकांचा समावेश आहे.बालनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन सुयश राजेंद्र म्हात्रे यांनी केले होते. या यशाबद्दल बालनाट्याच्या टीमचे संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, संकुलाचे संचालक प्राचार्य राजेंद्र म्हात्रे आणि शाळेच्या प्राचार्य मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे.
