शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, पर्यटनस्थळे व मंदिरे बंद
हरिभाऊ लाखे
नाशिक –राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असताना मंगळवारी नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसह ३०० मिलीमीटर पावसाचा सर्वात मोठा अलर्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने या संभाव्य नैसर्गिक संकटाला तोंड देण्याची युद्ध पातळीवर तयारी केली आहे. नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या पाच तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली असून आठवडे बाजारही बंद ठेवले जातील. गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रवास करणे टाळावे. शेतकऱ्यांनी शेतातही जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, पहिनेसह सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली असून तिथे पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला जात आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, कोकणसह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असताना नाशिकमध्ये तो मध्यम स्वरुपाचा होता. सोमवारी दुपारपर्यंत संततधार सुरू होती. या घटनाक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान विभागाच्या इशाऱ्याची माहिती दिली. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मंगळवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसारखा पाऊस कोसळू शकतो. बऱ्याच मोठ्या भागात ३०० मिलीमीटर पाऊस पडू शकतो. यामुळे बाधित होऊ शकणाऱ्या भागात प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर काही वेळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय आणि उपाय योजनांची माहिती दिली. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.
तीन तालुके केंद्रस्थानी…
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक ग्रामीण या तीन तालुक्यांच्या परिसरात ढगफुटीचा अंदाज आहे. त्याशिवाय सभोवतालचा नाशिक तालुका, पेठ, दिंडोरी आणि संपूर्ण पश्चिम पट्टा म्हणजे कळवण आणि बागलाण तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या पाच तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी बंद राहणार आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक ग्रामीणमधील आठवडे बाजारही बंद ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. गर्भवती महिलांसाठी विशेष मोहीम राबविली जाईल. ज्या महिलांची प्रसुतीची तारीख पुढील तीन ते चार दिवसात आहे, अशा सर्व महिलांना सोमवारीच रुग्णावयात सुरक्षितपणे दाखल करण्यात येईल.
पर्यटनस्थळांवर बंदी…
पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, वन विभागाने त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, पहीनेसह इतर सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात वन परीक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी माहिती दिली. खोल दरीत कोसळणाऱ्या दुगारवाडी धबधब्याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असते. धबधबा पाहण्यासाठी खोल दरीत उतरून जावे लागते. अकस्मात पाणी वाढल्याने दुगारवाडी धबधब्यासह अन्य पर्यटन स्थळांवर यापूर्वी दुर्घटना घडलेल्या आहेत. ढगफुटी सारख्या पावसाचा अंदाज वर्तविला गेल्याने वन विभागाने तातडीने सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंद केला.
त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी देवस्थान बंद
सोमवारी सूर्यास्तानंतर शेवटची आरती झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान नऊ जुलैपर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. भाविकांनी तिथे जाणे टाळावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. सप्तश्रृंगी गडावर ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथे गर्दी होऊ नये म्हणून मंगळवारी सप्तश्रृंगी देवीचे मंदिरही बंद ठेवले जाणार आहे.
