रमेश औताडे

मुंबई : मोठा वारसा नाही, महागडे क्लासेस नाहीत, केवळ बुद्धिमत्ता, अथक मेहनत आणि गुणवत्ता या बळावर एका तरुणीने जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थेचे दरवाजे खुले केले आहेत. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली (एनएलयू) ची माजी विद्यार्थिनी आणि सध्या सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युडिशियल क्लर्क’ म्हणून कार्यरत असलेल्या अनन्या बांगर हिची अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘कोलंबिया लॉ स्कूल’मध्ये एलएल.एम. (मास्टर ऑफ लॉज) या पदवीसाठी निवड झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील अनुभवाचे बळ गेली दोन वर्षे अनन्या सर्वोच्च न्यायालयात एका न्यायमूर्तींसोबत थेट कायदेशीर संशोधनाचे काम करत आहे. घटनात्मक कायदे, फौजदारी खटले, जामीन आणि अल्पसंख्याक हक्क अशा गंभीर प्रकरणांवरील तिच्या कायदेशीर टिपणांमधून तिच्या वैचारिक स्पष्टतेची साक्ष मिळते.

तंत्रज्ञान आणि सामाजिक भान केवळ पुस्तकी अभ्यासापुरते न थांबता, सर्वसामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेत मदत व्हावी यासाठी न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर कसा करता येईल, यावर अनन्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन केले आहे. ‘Lucio AI’ या लीगल-टेक स्टार्टअपमध्ये तिने काम केले असून, युनेस्कोच्या एका अभ्यासक्रमांतर्गत ‘अल्गोरिदमिक पूर्वग्रह’ आणि कायदा या विषयावर अभ्यास केला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये हार्वर्ड लॉ स्कूल आणि हार्वर्ड केनेडी स्कूल येथे ‘व्हिजिटिंग स्कॉलर’ म्हणूनही तिने धोरण व जागतिक न्यायाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.

“कोर्टातील प्रत्येक फाईल म्हणजे केवळ कागद नसतो, तर ती जिवंत माणसे आणि त्यांची आयुष्ये असतात. कायद्याला तांत्रिक ज्ञानासोबत सहानुभूतीचीही गरज असते, हे सर्वोच्च न्यायालयाने मला शिकवले,” अशा शब्दांत अनन्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाबासाहेबांच्या वारशाशी नाते कोलंबिया विद्यापीठाशी भारताचे ऐतिहासिक नाते आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच विद्यापीठात शिक्षण घेतले होते. “डॉ. आंबेडकरांनी जिथे शिक्षण घेतले, त्याच संस्थेत शिकण्याची संधी मिळणे हे केवळ शैक्षणिक यश नसून एका प्रेरणादायी परंपरेशी जोडले जाणे आहे,” असे अनन्या सांगते.

शिक्षिका ते भावी समाजसेविका हैदराबादच्या ‘देवनार अंध विद्यालया’त अनन्याने दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून जीवशास्त्र शिकवले आहे. भारतात कायदेशीर साक्षरता आणि एआयबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ती आता स्वयंसेवी संस्था (एनजीओ) स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

क्लासेस आणि पैशाच्या बळावर पुढे जाणाऱ्यांच्या गर्दीत अनन्या बांगरचा हा प्रवास स्वावलंबनाचा धडा देणारा आहे. स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून प्रामाणिक अभ्यास केल्यास न्यूयॉर्कच्या कोलंबिया लॉ स्कूलचे दरवाजेही उघडू शकतात, हे तिने दाखवून दिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *