मिरा -भाईंदर
शहरातील खड्डेमय रस्ते, निकृष्ट कामे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या परिस्थितीविरोधात नगरसेवक तथा गटनेते जय ठाकूर यांनी “Reel For Roads – मिरा-भाईंदर रील स्पर्धा २०२६” या अनोख्या जनआंदोलनाची घोषणा केली आहे. मिरा-भाईंदरमध्ये रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दावे केले जातात. मात्र पहिल्याच पावसात रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता हे दावे कितपत खरे आहेत, हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडला आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला शहरातील वास्तव दिसावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेबद्दल बोलताना जय ठाकूर म्हणाले, “जर सत्ताधाऱ्यांना शहरातील खड्डे दिसत नसतील, तर आता मिरा-भाईंदरची जनता त्यांना रीलच्या माध्यमातून प्रत्येक रस्ता दाखवेल. ही केवळ स्पर्धा नाही, तर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर उभे राहिलेले लोकआंदोलन आहे.” स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्डे, खराब रस्ते आणि नागरिकांना होणारा त्रास यावर क्रिएटिव्ह रील तयार करून सोशल मीडियावर #ReelForRoads हा हॅशटॅग वापरून पोस्ट करावी तसेच आयोजकांना टॅग करावे. संबंधित रील jaythakurspeaks@gmail.com या ई-मेलवर पाठवावी.
स्पर्धेचा कालावधी: ९ जुलै २०२६ ते २३ जुलै २०२६
निकाल: १ ऑगस्ट २०२६
स्पर्धेतील उत्कृष्ट रील्सना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास मेडिकल इन्शुरन्स, द्वितीय क्रमांकास कार इन्शुरन्स आणि तृतीय क्रमांकास बाईक इन्शुरन्स प्रदान करण्यात येईल. तसेच निवडक सहभागी नागरिकांना हेल्मेट व प्रथमोपचार किट देऊन सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
