मराठीची नवी ओरिजिनल सीरिज २४ जुलैपासून
संपदा सावंत
Zee5 मराठीने आपल्या आगामी ओरिजिनल सीरिज **‘अगं आई अहो आई’**चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून, ही सीरिज २४ जुलै २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये मुलगी, तिची आई आणि सासू यांच्यातील हळुवार, जिव्हाळ्याच्या नात्याचा वेगळा पैलू उलगडण्यात आला आहे.
वरुण नार्वेकर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन, तर कल्याणी पंडित यांनी लेखन केले आहे. जिओ स्टुडिओज, बहावा एंटरटेन्मेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. प्रेम, स्वीकार आणि आपुलकीमुळे कुटुंब अधिक घट्ट जोडले जाते, हा या सीरिजचा मुख्य संदेश आहे.
पुणे आणि कोल्हापूर या दोन वेगळ्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत लग्नानंतर एका तरुणीचा नव्या कुटुंबात स्वतःचे स्थान शोधण्याचा भावनिक प्रवास दाखवण्यात आला आहे. जन्मदात्या आईचे नाते जपत नव्या आईचा स्वीकार करताना तिच्या आयुष्यात घडणारे बदल, नव्या नात्यांमधील विश्वास आणि समजूतदारपणा यांचे प्रभावी चित्रण या सीरिजमध्ये करण्यात आले आहे. सासू-सुनेच्या नात्याकडे संघर्षाऐवजी मैत्री, प्रेम आणि परस्पर आदराच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या कथेत करण्यात आला आहे.
झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर आणि Zee5 मराठीच्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. यांनी बदलत्या काळातील वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा Zee5 मराठीचा प्रयत्न असल्याचे सांगितले. दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी अनेक वर्षांपासून सासू-सुनेचे नाते संघर्षाच्या चौकटीत दाखवले गेले असले, तरी या सीरिजमध्ये त्याची सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.
अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाल्या, प्रत्येक आईला आपल्या मुलीला नव्या घरात प्रेम, आधार आणि समजून घेणारी माणसे मिळावीत, अशी अपेक्षा असते. ही भावना ‘अगं आई अहो आई’मध्ये अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आली आहे. निर्मिती सावंत यांनीही सासू-सुनेच्या नात्याविषयीच्या पारंपरिक समजुती मोडणारी ही कथा असल्याचे सांगितले. तर हृता दुर्गुळेने लग्नानंतर नव्या आयुष्याला सामोरे जाणाऱ्या अनेक तरुणींच्या भावना आणि त्यांचा स्वीकाराचा प्रवास या भूमिकेतून साकारताना वेगळा अनुभव मिळाल्याचे सांगितले.
आपुलकी, विनोद, भावनिक प्रसंग आणि प्रत्येक घरात घडणाऱ्या सहज घटनांमधून कुटुंब, स्वीकार आणि नात्यांचा सुंदर उत्सव साजरा करणारी ‘अगं आई अहो आई’ ही ओरिजिनल सीरिज २४ जुलै २०२६ पासून केवळ Zee5 मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
0000000
