ज्येष्ठ नागरिकांनी लुटला पावसाळी सहलीचा आनंद
गाणी, नृत्य खवय्यांची धूम धमाल
मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांची पावसाळी सहल कर्जत येथील एंजल रिसॉर्ट येथे गेली होती. या सहलीसाठी गेलेल्या दोन बसमध्ये ५५ महिला व ४५ पुरुष सभासद असे एकूण १०० सभासद सहभागी झाले होते. सानपाडा येथील विरंगुळा केंद्राच्या कार्यालयाजवळून बस सुटण्यापूर्वी सहलीत सहभागी झालेल्या सर्वांना गुळाचा चहा देण्यात आला. बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाला पाण्याची बाटली व थोडासा नाष्ता म्हणून सुकामेवा देण्यात आला. महिलांचा सहभाग असल्यामुळे बसमध्ये अगदी आनंदाने गाणी म्हणत अडीच तासात कर्जत येथे रिसॉर्टवर बस पोहोचल्या. रिसॉर्टवर आगमन झाल्यानंतर सर्वांनी नाष्ता घेतला. त्यानंतर तेथील सदनिकांमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर तरणतलावात बहुतेक सभासदांनी पोहण्याचा आनंद घेतला. काहींनी चांगले नृत्य केले. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमांमध्ये महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला. मुंबईला परत निघण्यापूर्वी रिसॉर्ट मालकांनी सर्वांना गरम भजी आणि चहा दिला. सर्व ज्येष्ठ नागरिक पावसाळी सहलीचा आनंद लुटत प्रवास करत नवी मुंबईला सुखरूपपणे पोहोचले. ज्येष्ठ नागरिकांच्या या एकदिवशीय सहलीमध्ये संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, नाट्यकलाकार, अभिनेते व संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोळकर, संघाचे सचिव जगदीश एकावडे खजिनदार महादेव पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे सीमा बोराडे सहसचिव राजेंद्र कदम राजाराम घोलप, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम, माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ. विजया गोसावी, माजी सचिव चंद्रकांत पारपिल्लेवार, माजी खजिनदार विष्णूदास मुखेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.
