भाजप नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आरोप, निविदांच्या चौकशीची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील नालेसफाईतून काढलेला गाळ चक्क अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली व दिवा येथील जमिनीवर टाकण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र, शहरातील खाडी परिसरातच गाळ फेकला गेल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच जमिनीच्या सातबारा उताऱ्यांची छाननी न करताच बेकायदेशीरपणे नालेसफाईच्या तांत्रिक निविदा मंजूर केल्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी महासभेत सोमवारी केली.
ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले. प्रत्यक्षात बहुसंख्य नाल्यांची सफाई झाली नाही. तर किरकोळ गाळ काढून खाडी परिसरातच फेकला गेला. महापालिकेच्या नियमानुसार, गाळ काढण्यासाठी कंत्राटदाराकडे स्वत:ची किंवा भाड्याची जमीन असावी. मात्र, दिवा, मुंब्रा, माजिवडा आणि उथळसर येथील कंत्राटदारांनी एकाच व्यक्तीच्या दिवा येथील जमिनीवर गाळ टाकल्याची नोंद आहे. एका कंत्राटदाराने ठाण्यापासून ४० किलोमीटरवरील अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली येथील जमीन दाखविली. तसेच या जमिनीचा जुना सातबारा दाखविला असून, महापालिकेला दिलेल्या `एनओसी’वर पाचपैकी केवळ एकाच मालकाची नोंद आहे. दिवा येथील जमीनमालकाने स्टँम्प पेपरऐवजी साध्या कागदावर `एनओसी’ दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले अदा करू नयेत, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी केली.
अंबरनाथ तालुक्यातील जमिनीवर गाळ टाकण्यात आलेला नाही, असा थेट आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच संबंधित कंत्राटदारांकडून गाळ वाहून नेताना जीपीएस ट्रॅक रेकॉर्डिग प्रशासनाने उपलब्ध करावे, अशी मागणी करीत अर्चना मणेरा यांनी त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याची विनंती महासभेत केली.
चौकट
कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणे, खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू
बोरिवडे येथील मैदानाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यात बुडून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील काळ्या यादीतील कंत्राटदाराला नियमबाह्यपणे हे कंत्राट दिले गेले. या कंत्राटदाराने खड्डा खोदताना कोणतेही बॅरिकेड व सुरक्षा फलक लावले नव्हते. या प्रकरणी कंत्राटदारावर कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही महापालिकेकडून दंडात्मक वा कंत्राट रोखण्याची कारवाई झालेली नाही. संबंधित कंत्राटदार हा काळ्या यादीत असल्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार करूनही अद्यापी, मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करून महापालिकेच्या संबंधित अभियंत्याला निलंबित करून कंत्राट रद्द करावे. तसेच मुलाच्या कुटुंबियांना कंत्राटदार व महापालिकेने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी दिली.
0000000000
