सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध जैव विविधता भविष्यात अबाधित राहणार काय असा सवाल करत प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग,अवैध मायनिंग , येऊ घातलेले अणु ऊर्जा प्रकल्प या सारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘सिंधुदुर्ग डॉक्टर्स फ्रेटरनिटी क्लब ‘तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विकास परिषदेत’ या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आंबोली -चौकुळ  येथे आयोजित करण्यात आलेल्या या   परिषदेत वैद्यकीय विषयांसह  ‘सिंधुदुर्गातील जैवविविधते समोरील आव्हाने’ या विषयावर एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे सूत्रचालन व निवेदन डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना डॉ. परुळेकर म्हणाले, सिंधुदुर्गातील निसर्ग अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच संवेदनशील आहे अशा प्रकारची जैवविविधता निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. इथला प्रदेश हा जगातील ३६ जैविविधता ‘हॉटस्पॉट’ पैकी एक आहे. हा भाग संपूर्ण देशासाठी एक अमूल्य नैसर्गिक ठेवा आहे. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी आपले संशोधन आणि निरीक्षणे मांडली. जिल्हा वन्यजीव रक्षक संजय सावंत यांनी तिलारी परिसरातील पट्टेरी वाघांच्या अस्तित्वासह गेल्या काही वर्षांमध्ये विकसित होत असलेल्या व्याघ्र प्रजनन क्षेत्राची माहिती दिली. संशोधक हेमंत ओगले आणि डॉ.दत्तप्रसाद सावंत यांनी पश्चिम घाटातील सुमारे १६०० किलोमीटरच्या जैव विविधतेचा आढावा घेतला.
अंबोली- चौकुळ परिसरात असलेल्या फुलपाखरांच्या विविध प्रजातींची माहिती दिली तसेच या परिसरात  आढळून आलेल्या ‘चतुर’ या कीटकाच्या नव्या प्रजाती विषयी माहिती दिली. संपूर्ण श्रीलंका देशात  ‘चतुर’ कीटकांच्या जितक्या प्रजाती आहेत तितक्याच प्रजाती एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.अशी माहिती त्यांनी दिली. पक्षी तज्ञ भाग्यश्री परब यांनीही अतिशय उदबोधक  माहिती दिली. पूर्वी जिल्ह्यात २५० पक्षी प्रजातींची नोंद होती. आता हा आकडा ४०० च्या वर गेला आहे. मात्र बेसुमार वृक्षतोडीमुळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागल्यामुळे या दुर्मिळ पक्षांच्या अधिवासाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे असे त्यांनी नमूद केले.
जैव विविधता अभ्यासक काका भसे यांनी पर्यटन विषयक धोरण, तसेच अन्य शासकीय योजनांसंबंधीच्या धोरणांमुळे पर्यावरण विषयक  समस्या वाढल्या असून या संकटाच्या पार्श्वभूमीवर जैववविधतेच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली. या क्लब तर्फे अशा प्रकारच्या कार्यशाळा परिषदा आणि अभ्यास वर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणार असून त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांमध्ये पर्यावरण बचावासाठी जनजागृती होऊ शकेल असा विश्वास ‘क्लब’चे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *