औचित्य माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास काढून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सुनिल कुरकुटे, नगरसेवक प्रभाग क्रमांक १९ यांच्या पुढाकारातून, भारत ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य राजेश राय, नगरसेवक सुनिल कुरकुटे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच संदीप नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नगरसेवक सुनिल कुरकुटे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मध्य रेल्वेच्या बोर्डावर सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल परिवहन समितीचे सदस्य राजेश राय यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
०००००
