दगड उत्खननासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केली होती जन सुनावणी
पालघर :  खोल समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात भराव करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक गौण खनिजांचे उत्खनन करण्यात येणार आहे. पालघर तालुक्यातील गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड खाणींमधून दगडाचे उत्खनन करण्यात येणार आहे. सदर बाबीच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जाहीर सुनावणीचे आयोजन रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या तज्ञ मंडळींच्या अहवालावरून आणि जन सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी जन सुनावणीत गोंधळ घातला.
गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड उत्खननामुळे पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम आणि या प्रक्रियेमुळे स्थानिकांच्या जीवनमानावर होणारा बदल याबाबत मंडळाकडून एक अहवाल सादर करण्यात आला. सदर अहवाल अध्ययनासाठी दिलेला कालावधी अपुरा असल्याचे प्रथमतः आंदोलकांकडून सांगण्यात आले. सदर अहवाल मराठी मध्ये आणि त्याचा मतितार्थ संक्षिप्त रूपात सादर करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्याला देखील नकार दिला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने रविवारी शिगाव- खुताड येथे जाहीर जन सुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीत आंदोलकांनी तज्ञ मंडळींच्या अहवाला सोबतच अतिवृष्टी आणि शेतीची कामे सुरू असताना जन सुनावणी का घेतली? असा सवाल उपस्थित केला. दगडखणींमधून होणाऱ्या उत्खननाचा संभाव्य जीवनमानावरील आणि पर्यावरणावरील परिणाम याबाबत तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना या  सुनावणीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
अतिवृष्टी आणि शेतीची कामे यांची कारणे देत जन सुनावणी रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. गारगाव गट क्रमांक ८२ (क्षेत्र.२४.९४ हे.) साठी आयोजित सुनावणीमध्ये ९० नागरिक, गट क्रमांक ८२ (क्षेत्र.१७.०८ हे.) साठी ७२ आणि खानिवडे गट क्रमांक ९ (क्षेत्र.१५.३९ हे.) ६० ते ७० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पर्यायांना आंदोलकांनी धुडकारले. जन सुनावणीच्या सभा मंडपा बाहेर येऊन त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर देखील आंदोलन सुरूच राहिले. अखेरीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जन सुनावणीचा कारभार सुरू करण्यात आला. यादरम्यान कुठलीही पोलिसी कारवाई होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली. जन सुनावणीचा कारभार सुरू असलेला पाहता घोषणाबाजीचे रूपांतर गोंधळबाजी मध्ये झाले. तुमच्या हरकती व सूचना लिखित अथवा कथित स्वरूपामध्ये प्रशासनाकडे नोंदवा अशी पोलिसांच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. एकंदरीतच जन सुनावणी उधळून लावण्याचा आंदोलकांचा मानस होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकंदरीत झालेल्या घडामोडींची नोंद घेऊन जन सुनावणी पूर्ण केली.पोलिस प्रशासनाने देखील सर्व आंदोलकांच्या मागण्यांची नोंद केली. प्रशासनाच्या वतीने जन सुनावणी मध्ये ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.
चौकट
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला तज्ञ मंडळींचा अहवाल इंग्रजीमध्ये असून तो फार मोठा आणि क्लिष्ट असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यावर मंडळाच्या वतीने तो मराठीमध्ये व संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले ते देखील ग्रामस्थांनी झिडकारले.सुनावणी मध्ये अपेक्षित समस्या निराकरण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *