जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांचे विशेष मार्गदर्शन
अशोक गायकवाड
पालघर : महसूल विभाग हा केवळ महसूल वसुली करणारा विभाग राहिलेला नसून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाला चालना देणारा विभाग म्हणून त्याचे स्वरूप बदलले आहे. शासनाच्या लोकाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. महसूल दिन आणि पालघर जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर , अपर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके,भारतीय प्रशासन सेवेतील (प्रशिक्षणार्थी ) पी.व्ही अमल ,उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, विजया जाधव, तेजस चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील, तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड म्हणाल्या की, १ ऑगस्ट २००२ पासून महसूल दिन साजरा करण्यामागील संकल्पना म्हणजे महसूल विभाग अधिकाधिक नागरिकाभिमुख करणे. स्वातंत्र्यानंतर महसूल प्रशासनाची भूमिका बदलत गेली असून आज हा विभाग महसूल संकलनाबरोबरच विकास, जनकल्याण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षभरात सातबारा उताऱ्यावरील हक्क सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विशेषतः वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातबारा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्रत्यक्षात येत असून हा महसूल विभागासाठी अभिमानास्पद टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. महसूल विभाग कृषी, ग्रामविकास, भूमी अभिलेख, मुद्रांक व नोंदणी यांसह विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत असल्याचे सांगताना त्यांनी पालघर जिल्ह्यात सर्व विभाग एकाच प्रशासकीय इमारतीत कार्यरत असल्याने समन्वय अधिक परिणामकारक होत असल्याचे स्पष्ट केले. आपत्ती व्यवस्थापनात महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी अलीकडील अतिवृष्टीच्या काळात विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यात प्रशासनाला यश आल्याचे नमूद केले. शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, सर्वांसाठी घरे अभियान, २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमानुकूलकरण यांसारख्या निर्णयांमधून शासनाचा नागरिकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून, शासनाच्या योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. पालघर जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचा उल्लेख करत, “पालघर हे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. पुढील पाच ते दहा वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होणार असून हा विकास सर्व समावेशक आणि शाश्वत राहील, यासाठी प्रशासन प्राधान्याने काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *