डोंबिवलीत बंद रिक्षात बाळाला सोडून भाचा फरार,
कल्याण : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुंबई आणि डोंबिवलीत समोर आली आहे. मामाने लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून एका मूकबधिर भाच्याने मामाच्या अवघ्या एक वर्षाच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुर्ल्यातून पळवून नेलेल्या या चिमुकल्याला डोंबिवलीतील एका बंद रिक्षात सोडून आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळ सुरक्षित सापडले असून आरोपीचा शोध सुरू आहे.
कुर्ला परिसरातून एक वर्षाचे बाळ अचानक बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर बाळाला घेऊन जाणारा तरुण हा श्यामसुंदर कांबळे, यांचा मूकबधिर भाचा अमन सकट, असल्याचे समोर आले. मामाने आपल्या मेहुणी सोबत लग्न लावून देण्यास नकार देत, लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून अमनने मामाला धडा शिकवण्यासाठी त्याच्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
अपहरणानंतर त्याने चिमुकल्याला डोंबिवलीतील कोपर परिसरातील एका बंद रिक्षात सोडून पलायन केले. दरम्यान, विष्णूनगर पोलिसांना हे बाळ सुरक्षित अवस्थेत आढळून आले. बाळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच कुर्ल्यातील अपहरण प्रकरणाचा उलगडा झाला. सध्या बाळावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी अमन सकटचा पोलीसांकडून कसून शोध घेतला जात असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले.
०००००
