१५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवर  बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार…!
कणकवली(प्रतिनिधी )–सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक पद्धतीने  ‘ड्रोन सर्वेक्षण’ करून प्रत्येक मालमत्तेला ‘प्रॉपर्टी कार्ड ‘देण्याची योजना राबविण्यात येणार.त्यासाठी दोनशे सर्व्हेअर्सना परवाने  देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा  लागू करून शासनमान्य  मालकी हक्काचे कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच नोंदणीपूर्वी मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल अशा घोषणा राज्याचे  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘आयोजित महसूल समाधान शिबिराच्या निमित्ताने आटोजीत करण्यात आलेल्या समारंभात बावनकुळे बोलत होते. ३१ मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेत रस्त्यांचे सीमांकन, मोजणी, अतिक्रमण हटवून क्रमांक देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे बावनकुळे म्हणाले. या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या सरकारी जागांवरील घरांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यात येणार असून, १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील ले-आउट मध्ये बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी  जाहीर केला.
सिंधुदुर्गचे  पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करताना, जिल्ह्याची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. आवश्यक तेथे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मात्र प्रामाणिक नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केले. बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो, तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श आहेत असे गौरवोदगार राणे यांनी काढले.
बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राणे  बंधूंचे तोंड भरून कौतुक केले. मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री म्हणून नितेश राणे हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत शिवाय हे खातं ते प्रभावीपणे सांभाळत आहेत अशा शब्दात त्यांनी नितेश राणे यांचा गौरव केला. आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका घेऊन मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन देतो, असे त्यांनी यावेळी  स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे. त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला, असेही त्यांनी सांगितले.
कोकणात झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणांची महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणांच्या चौकशीसाठी २० अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती मागील दहा वर्षांच्या कागदपत्रांची चौकशी करणार आहे. या तपासात य चौकशीत जे कोणी अधिकारी कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी काल रत्नागिरी येथे बोलताना केले
शेतकऱ्यांना कर्ज देणे ही बँक आणि महसूल विभागाची जबाबदारी आहे. कोकणात सातबारावर अनेक नावे असतात.परंतु कर्ज देताना संमती पत्र मिळणं अवघड होऊन जातं त्यामुळे बँका कर्ज देत नाहीत तेव्हा हमीपत्रावर कर्ज देण्याबाबत शासन विचार करीत असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *