तर बंद उपहारगृहामुळे नाट्यरसिकांची गैरसोय
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाजवळ असलेल्या आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी झालेल्या ‘ऑल द बेस्ट’ या हाऊसफुल नाट्यप्रयोगाला शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा प्रयोग कलाकार वाहतूक कोंडीत अडकल्याने सुमारे अर्धा तास उशिराने सुरू झाला.
रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कलाकार वेळेत नाट्यगृहात पोहोचू शकले नाहीत. आयोजकांनी प्रेक्षकांना विलंबाची माहिती दिल्यानंतर रसिकांनी संयम राखत प्रतीक्षा केली. या प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. मात्र, नाट्यगृह परिसरात उपहारगृह व अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रेक्षकांची गैरसोय झाली. यामुळे वाहतूक नियोजनासह सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
आचार्य अत्रे रंगमंदिर हे कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरातील नाट्यरसिकांसाठी प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या रंगमंदिरातील उपहारगृह गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. यामुळे प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत असून मध्यंतरात बाहेर जाऊन पाणी, खाद्यपदार्थ आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, उपहारगृह चालविणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नवीन ठेका अद्याप कोणालाही देण्यात आला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
००००००
