मलेशियातील हॉस्पेक्स मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईला विजेतेपद
अशोक गायकवाड
रायगड- कर्जत : कर्जतचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विनय सांगळे यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत शानदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील नामांकित मेडिकल क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयात डॉ. सांगळे यांचे योगदान मोलाचे ठरले. गेली १८ वर्षे कर्जतमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे डॉ. विनय सांगळे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच क्रिकेटची आवडही सातत्याने जोपासली आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी दुबई, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहा वेळा ‘राष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज’ पुरस्कार डॉ. विनय सांगळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी तब्बल सहा वेळा ‘बेस्ट बॉलर’ (सर्वोत्तम गोलंदाज) हा राष्ट्रीय किताब पटकावला आहे. उदयपूर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी हा मान मिळवला असून, ही कामगिरी करणारे ते मेडिकल क्रिकेटमधील मोजक्या आणि अव्वल गोलंदाजांपैकी एक मानले जातात. ५६० विकेट्सचा विक्रम ‘डावखुरा जादुई फिरकी गोलंदाज’ अशी ओळख असलेल्या डॉ. सांगळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धांमध्ये आतापर्यंत ५६० हून अधिक विकेट्स घेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ते मेडिकल क्रिकेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या डॉ. विनय सांगळे यांनी कर्जतचे नाव देश-विदेशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाविश्व तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
