आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
– तातडीने कार्यवाहीचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश
छत्रपती संभाजीनगर: पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना अद्यापही शासनाने जाहीर केलेली रोख पारितोषिकाची रक्कम मिळालेली नसल्याचा मुद्दा आता विधान भवनापर्यंत पोहोचला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विश्वविजेत्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक आणि शासकीय सेवेत नोकरी देण्याची ठाम मागणी केली.
दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य सरकारने ₹१० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिप / वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या सांघिक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक देण्याची तरतूद असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अद्यापही जाहीर केलेले पारितोषिक मिळालेले नाही. त्यामुळे शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित खेळाडूंना रोख बक्षीस तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.
