ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर यांचे प्रतिपादन
मुंबई : कविता ही अत्यंत अवघड साहित्यप्रकार असून तिच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर यांनी केले.  अखिल भारतीय साहित्य परिषद  साहित्य भारती (कोकण प्रांत), मुंबई उपनगर शाखेच्या वतीने महाकवी कालिदास जयंतीनिमित्त ‘आषाढरंग’ या काव्यपुष्पाचे आयोजन  बोरिवली पूर्व येथील श्रीमती जयाबेन खोत शाळेत   करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरुरकर या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी अनुराधा नेरूरकर यांनी पावसाची दोन वेगवेगळी रूपे उलगडणाऱ्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे २२ नवोदित व हौशी कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भाग्यश्री फडके धर्माधिकारी यांनी परिषद गीत सादर केले. ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. साहित्य भारतीचे मुंबई उपनगराचे संपर्क प्रमुख जयेश मेस्त्री यांनी ‘आषाढरंग’ या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली व साहित्य, कविता आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या साहित्य भारतीच्या उपक्रमांची माहिती  करून देण्यात आली.
‘आषाढरंग’मध्ये सहभागी नवोदित कवी-कवयित्रींनी आपल्या विविध कविता सादर केल्या. सर्व सहभागी कवी-कवयित्रींना प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विठ्ठल घाडी यांनी केले. आभार प्रदर्शन भाग्यश्री फडके-धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाला साहित्य भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष व लेखक दुर्गेश सोनार, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे सदस्य  किशोर उन्हेलकर आणि त्यांचे सहकारी तसेच सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांच्या सह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *