केशव बनसोडे यांच्या मृत्यूची चौकशी करून कुटुंबीयांना थकीत वेतन व आर्थिक मदत द्या — डॉ. डी. एल. कराड
अनिल ठाणेकर
ठाणे-जालना जिल्ह्यातील आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी केशव बनसोडे यांना तब्बल ६७ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सातत्याने वेतन थकीत राहिल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर ते दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आणि आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्यात अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर २२ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेची सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना थकीत वेतनासह आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी युनियनचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे केली आहे.
डॉ. कराड यांनी पणन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्याना सलग ६७ महिने वेतन न मिळणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर त्याला त्याच्या श्रमाचा मोबदला वेळेवर मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र एवढ्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत वेतन थकीत राहण्यामागील कारणे काय आहेत, संबंधित अधिकारी व प्रशासनाने कोणती कार्यवाही केली आणि शासनाच्या नियमांचे पालन का झाले नाही, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.केशव बनसोडे यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनेक महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्याच काळात बनसोडे हे आजाराने ग्रस्त झाले. उपचारासाठी आवश्यक असलेला खर्च करणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आणि अखेर त्यांचे निधन झाले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची केवळ प्रशासकीय बाब म्हणून नव्हे, तर मानवी दृष्टिकोनातूनही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आष्टी बाजार समितीतील घटना ही एकाकी घटना नसून राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त होत असल्याचा दावा डॉ. कराड यांनी केला आहे. काही बाजार समित्यांमध्ये अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी नमूद केले.बाजार समितीचे उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे केले जाते; मात्र आर्थिक अडचणींचा सर्वाधिक परिणाम नियमितपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होऊ नये, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरी, व्यापारी आणि कामगारांसाठी महत्त्वाच्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिनोन्महिने वेतन न मिळणे आणि त्यातून त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. केशव बनसोडे यांच्या प्रकरणात सत्य परिस्थिती समोर आणून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी डॉ. डी. एल कराड यांनी केली आहे.
