संपदा सावंत
मुंबई :  ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला ‘फूल और कांटे’ चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे दिग्दर्शक कुकू कोहली यांचे मंगळवारी वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
कुकू कोहली यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना मोठा धक्का बसला. पतीच्या अंत्यदर्शनावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाइकांनी त्यांना सावरले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती त्यांचे मित्र आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी दिली.
कुकू कोहली यांच्या अंत्ययात्रेला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता विकी कौशल, स्टंट दिग्दर्शक शाम कौशल आणि अशोक पंडित यांच्यासह अनेकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
‘अवतार कोहली’ या नावाने जन्मलेल्या कुकू कोहली यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. १९७१ मध्ये राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अजय देवगणच्या कारकिर्दीला दमदार सुरुवात झाली.
यानंतर त्यांनी ‘कोहराम’ आणि १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुहाग’सारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘सुहाग’मधून अजय देवगण आणि अक्षय कुमार ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र आली होती. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वो तेरा नाम था’ हा त्यांच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट ठरला.
कुकू कोहली यांच्या पश्चात पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी तसेच पहिल्या पत्नी रीता कोहली यांच्यापासून झालेल्या दोन मुली पूजा आणि करिश्मा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *