१,३२३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा; मुलींच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता ९७.२ टक्के
राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मूलभूत सुविधांच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असली, तरी इंटरनेट सुविधेच्या बाबतीत जिल्हा राज्याच्या सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने मागे असल्याचे केंद्र सरकारच्या २०२४-२५च्या शिक्षणविषयक आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १,३२३ प्राथमिक शाळा आहेत. यापैकी ९९.८ टक्के शाळांमध्ये पिण्याचे पाणी, ९९.६ टक्के शाळांमध्ये हात धुण्याची सुविधा, ९९.७ टक्के शाळांमध्ये वीज आणि ९९.९ टक्के शाळांमध्ये ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उपलब्धता ९७.२ टक्के आहे.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने यांनी सादर केली.
शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्गखोल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक कामे ३० दिवसांत हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, उपलब्ध सुविधांच्या आधारे शाळांचे ए, बी, सी, डी असे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्गातील केवळ ३०.७ टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. राज्याची सरासरी ७२.१ टक्के असल्याने जिल्हा तब्बल ४१.४ टक्के गुणांनी मागे आहे. जिल्ह्यात ८४ टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा असली, तरी इंटरनेटच्या अभावामुळे ऑनलाइन अध्ययन, डिजिटल सामग्री आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापनाचा पूर्ण लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यात अडथळे येत आहेत.
जिल्ह्यातील ९०.५ टक्के शाळांमध्ये खेळाचे मैदान उपलब्ध असून उर्वरित शाळांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच मुलींची स्वच्छतागृहे प्रत्यक्षात स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित वापरण्यायोग्य आहेत की नाही, याचीही तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या २०२४-२५च्या शैक्षणिक गुणवत्ता अहवालात सिंधुदुर्गला ३७७ गुण मिळाले आहेत. या निर्देशांकात शैक्षणिक गुणवत्ता, वर्ग-अध्यापन, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुविधा, शाळा सुरक्षा, डिजिटल शिक्षण आणि प्रशासन अशा सहा प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतही सिंधुदुर्गची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *