गेल्या काही महिन्यांपासून वेतन थकले
मिरा-ईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) मुख्यालयात श्रमजीवी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक मोर्चा काढला. हा मोर्चा थेट आयुक्तांच्या केबिन समोर धडकला आणि कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे देऊन बसले. मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी आणि कंत्राटी कामगार हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. श्रमजीवी कामगार संघटना ही MBMC मधील सफाई आणि कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी मुख्य संघटना आहे. यापूर्वीही कामगारांनी गणवेश न मिळाल्याने अर्धनग्न होऊन काम करून निषेध केला होता. तसेच गेल्या काही महिन्यांपासून पगार थकल्याचा आरोप करत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन देखील केले होते.
ताज्या आंदोलनातही कामगारांच्या प्रलंबित मागण्या, वेतनवाढ, कायमस्वरूपी नोकरी आणि कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा या मुद्द्यांवरून हा मोर्चा काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. एमबीएमसी प्रशासनाकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आयुक्तांनी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आश्वासन दिल्याची माहिती यापूर्वीच्या अशाच आंदोलनात समोर आली होती. सध्या महापालिका परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
0000
