पक्क्या घरवाल्यांना लाभ, बेघर गरिबांना डावलले
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील खुटल (बा) ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेसाठी एकूण ३२५ लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत तयार करण्यात आली आहे. मात्र या यादीवर गावातील ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, ज्यांच्याकडे आधीच पक्के स्लॅबची घरे आहेत अशा सुस्थितीतील व्यक्तींची नावे घरकुलाच्या यादीत घेण्यात आली आहेत. तर ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, जे पत्र्याच्या झोपडीत राहतात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे अशा गरीब कुटुंबांची नावेच सर्वेक्षण यादीत घेतली गेली नाहीत.
घरकुलासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण हे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवक यांनी आपल्या नातेवाईकांना आणि मर्जीतील लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बोगस कारभाराविरोधात ग्रामस्थांनी १८ ऑगस्टला झालेल्या बोगस ग्रामसभेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर भूमिपुत्र एल्गार संघटनेने तात्काळ ग्रामपंचायतीच्या विरोधात पंचायत समिती मुरबाड येथे धरणे आंदोलन करण्याचे आयोजन केले.
या आंदोलनात संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली की, गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन फेर स्थळ पाहणी करून यादीची तपासणी करावी. यादीतील प्रत्येक लाभार्थ्याच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून पक्के घर असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळावीत आणि घर नसलेल्या खऱ्या गरजू कुटुंबांची नव्याने पाहणी करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा.
या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि किसळ ग्रामपंचायत सरपंच कॉ. कविता वरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव, तालुका अध्यक्ष जगदीश शिद, उपाध्यक्ष बुधाजी खंडागळे, तालुका प्रवक्ता बाळा दळवी, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पादीर, कैलास खंडागळे, मारुती वाघ, सुरेश मोढवे, तानाजी भला, कांताराम पोकळा, पंढरीनाथ दळवी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००००
