अनिल ठाणेकर
ठाणे : येत्या ३० ऑगस्टला होणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉनच्या अंतिम नियोजनाची बैठक झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विविध गटनेते, अतिरिक्त आयुक्त, पोलीस व महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळी वातावरण आणि मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण, पार्किंग, बॅरिकेडिंग, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मोबाईल टॉयलेट्स आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची १० डॉक्टरांची पथके, रुग्णवाहिका तसेच मार्गावरील रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मॅरेथॉन मार्गावरील खड्डे बुजवणे, अतिक्रमण हटवणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मॅरेथॉन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात यशस्वी करण्याचे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.
चौकट : मॅरेथॉनवर कॉफी टेबल बुक
यंदाच्या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मॅरेथॉनच्या मंचावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी दिली.
