सप्टेंबरपासून रायगडात ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान
अशोक गायकवाड
अलिबाग: महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत रायगड जिल्ह्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त हे अभियान राबविण्यात येत असून, जमिनीशी संबंधित महसुली दावे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने कायमस्वरूपी निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्याबरोबरच महसूल न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होणार आहे. अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार स्तरावर ५ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत महसूल अदालती आयोजित करण्यात येणार आहेत. अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, माणगाव, महाड, रोहा, श्रीवर्धन आदी ठिकाणी संबंधित तालुक्यांतील प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
