पुणे घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीची स्थायी समिती सभा १० मिनिटे तहकूब
कल्याण : पुण्याच्या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना भाजपा युती तुटण्याच्या उंबरठ्यावर असून याबाबत केडीएमसीत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिवसेनेने मनसेची साथ सोडण्याची मागणी कायम ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली असून याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात येणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी माहिती उपहापौर राहुल दामले यांनी दिली. पुणे घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीची स्थायी समिती सभा भाजपा नगरसेवकांच्या मागणीनुसार १० मिनिटे तहकूब करण्यात आली. तर हि सर्व  भाजपाची नाटकं असून सेना भाजपा सत्तेशिवाय राहू शकत नसल्याची टीका कॉंग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.
पुणे येथील सरकारी कॉलेजमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरवल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून कल्याणमध्ये देखील याची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. केडीएमसीमध्ये शिवसेना भाजपाची युती असून शिवसेनेला मनसेने पाठींबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने मनसेसोबतची युती तोडावी अन्यथा भाजपा सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षात बसू असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्षांनी मंगळवारी दिला होता.
या इशाऱ्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक केडीएमसीच्या उपमहापौर दालनात पार पडली. या बैठकीला भाजपाचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, कल्याण लोकसभा प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपमहापौर राहुल दामले, सभागृह नेते वरुण पाटील, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक दिपेश म्हात्रे, महेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेने मनसेसोबत युती तोडावा अन्यथा भाजपा विरोधी पक्षात बसेल असा अत्यंत गंभीर निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून असून हा निर्णय पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात येणार आहे. तर आजच्या बैठकीत गंभीर निर्णय घेतले असून याबाबत पक्षश्रेष्टी अंतिम निर्णय घेतील असे उपमहपौर राहुल दामले यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरवल्याच्या निषेधार्थ आज केडीएमसी मुख्यालयात सुरू असलेली स्थायी समितीची सभा १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. भाजपाने मांडलेल्या या तहकुबीला शिवसेनेने देखील प्रतिसाद देत स्थायी समितीची सभा १० मिनिटे तहकूब केली. युती धर्म म्हणून शिवसेनेने या तहकुबीत आमची साथ दिली असून, केडीएमसीत शिवसेनेसोबत मनसे युतीमध्ये आहे. मात्र शिवसेनेने मनसे सोबत युती तोडावी ही आमची मागणी कायम असल्याचे भाजपाच्या सदस्यांनी सांगितले.
दरम्यान भाजपच्या या भूमिकेवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे ‘नाटक’ असल्याची टीका केली. “भाजप आणि शिवसेना सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. स्थायी समितीची सभा तहकूब केल्यानंतर काही वेळातच शिवसेना आणि भाजपचे नेते पुन्हा मांडीला मांडी लावून बसले,” असा टोला त्यांनी लगावला. एकंदरीतच कल्याण-डोंबिवलीतील सत्तासमीकरणांमध्ये पुढील काळात काय बदल होतात आणि मनसेच्या सत्तेतील सहभागाबाबत भाजपची भूमिका पक्षश्रेष्ठी कशी घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *