मिरा -भाईंदर : श्रमजीवी रयत कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान अयुब पटेल यांना श्रमजीवी संघटनेच्या वतीने मानाचा ‘स्वातंत्र्यदूत पुरस्कार’ आणि पदक प्रदान करण्यात आले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील कष्टकरी, उपेक्षित आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या अविरत संघर्षाबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित आणि संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ यांच्या हस्ते सुलतान पटेल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
“संघर्षाच्या मैदानात आमिषांना बळी न पडता, कामगारांच्या खांद्याला खांदा लावून न थकता उभा राहणारा कार्यकर्ताच खरा स्वातंत्र्यदूत ठरतो,” अशा शब्दांत विवेक पंडित यांनी सुलतान पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. कष्टकऱ्यांच्या घामाला योग्य दाम आणि वंचितांना आत्मसन्मान मिळवून देणे हेच संविधानाचे खरे उद्दिष्ट असल्याचे पंडित यांनी यावेळी स्पष्ट केले. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सभागृहात उपस्थित शेकडो कामगारांनी घोषणाबाजी करत आणि टाळ्यांच्या कडकडाटात सुलतान पटेल यांच्या या सन्मानाचे स्वागत केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *