मिरा -भाईंदरमध्ये लाखोच्या बक्षिसांची उधळण
अरविंद जोशी
मिरा -भाईंदर : गोपाळकाला उत्सव मिरा -भाईंदर शहरात यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. शहरात विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, त्यात भाईंदर पूर्वेतील नवघर मैदानातील ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’ची दहीहंडी मुख्य आकर्षण ठरली. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि वंदना विकास पाटील जनहित संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्वेच्या नवघर मैदानावर विश्वविक्रमी संस्कृती दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. यंदा थर रचण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. भाईंदरच्या जय मल्हार गोविंदा पथक आणि जय महाराष्ट्र गोविंदा पथक या दोन स्थानिक पथकांनी शिस्तबद्ध पद्धतीने ८ थरांची यशस्वी सलामी देत उपस्थितांची मने जिंकली.
९ थर लावणाऱ्या स्थानिक पथकाला ५ लाख रुपये व ट्रॉफी, तर बाहेरील पथकाला २ लाख रुपये. ८ थरांसाठी स्थानिक पथकाला ५० हजार (बाहेरील पथकाला २५ हजार), ७ थरांसाठी १० हजार रुपये आणि केवळ सलामी देणाऱ्या पथकाला ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक.
या उत्सवात बिग बॉस फेम प्रसिद्ध आगरी-कोळी गायक व संगीतकार दादूस यांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाने रंगत वाढवली. शहरात ठिकठिकाणी मोठ्या दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. मीरा रोडच्या शांती पार्क येथील सेंटर प्लाझा हॉलजवळ ३० लाखांहून अधिक रकमेची दहीहंडी उभारण्यात आली होती. तिथे ९ थर लावणाऱ्या पथकासाठी ५१ हजारांचे बक्षीस होते.
भाईंदर पश्चिमेला नगरभवनाजवळ मनसे उपशहर प्रमुख अभिनंद चव्हाण यांच्यावतीने ११,११,१११ रुपयांची, तर बावन जिनालय जैन मंदिराशेजारी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावतीने ७,७७,७७७ रुपयांची दहीहंडी उभारण्यात आली होती. डीजेच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात संपूर्ण मिरा -भाईंदर दुमदुमून गेले होते.
