अनिल ठाणेकर

ठाणे : असंघटित क्षेत्रातील कामगार, वंचित महिला, गरजू नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देतानाच मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी REAP एज्युकेशन अॅक्शन प्रोग्राम आणि ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथे ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लीगल एड क्लिनिक’ सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र एस. पाजणकर यांच्या हस्ते झाले.

या केंद्रामुळे कळवा परिसरातील नागरिकांना कायदेविषयक माहिती, मोफत कायदेशीर सल्ला तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक मदत त्यांच्या जवळच उपलब्ध होणार आहे. गरजू नागरिकांना आवश्यकतेनुसार न्यायालयीन प्रकरणांसाठी मोफत वकील उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला उप कामगार आयुक्त विजय सर, सहाय्यक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली अंधाळे, पॅनेल वकील ॲड. तृप्ती पाटील यांच्यासह पोलीस प्रशासन, कामगार विभाग, न्यायव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र एस. पाजणकर यांनी मार्गदर्शन करताना न्याय हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहता कामा नये. अनेक नागरिकांना आपल्या हक्कांची आणि कायद्याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची आणि कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उप कामगार आयुक्त विजय सर यांनी असंघटित व संघटित क्षेत्रातील कामगारांचे हक्क, बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध योजना तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी नागरिकांच्या तक्रारी, स्थानिक गुन्हेगारी आणि पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली अंधाळे यांनी महिला व बालकांची तस्करी, बालमजुरी आणि जबरदस्तीच्या कामाबाबत प्रशासनाच्या भूमिकेची माहिती दिली.

रिप (Reach Education Action Programme)चे संचालक जॉय फर्नांडिस यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती देताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, आरोग्य आणि कायद्याचे ज्ञान पोहोचवणे हे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यावेळी लीगल एड क्लिनिकच्या मोफत सेवांची माहिती देणाऱ्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. उद्घाटनानंतर नागरिकांसाठी प्रश्नोत्तर व संवाद सत्र घेण्यात आले. यामध्ये कायदेविषयक समस्या, कामगारांचे हक्क, कौटुंबिक प्रश्न आणि शासकीय योजनांबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. उपस्थित अधिकारी आणि वकिलांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमामुळे कळवा परिसरातील गरजू नागरिकांना न्यायव्यवस्थेशी जोडणारा महत्त्वाचा दुवा निर्माण झाला असून, ‘पैशाअभावी कोणीही न्यायापासून वंचित राहू नये’ या उद्देशाला बळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *